गडचिरोली : अवैध सागवानासह ९.५ लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
एटापल्ली, दि. ०१ : भामरागड वनविभागाअंतर्गत येणाऱ्या एटापल्ली वनपरिक्षेत्रातील नैनवाडी परिसरात वन विभागाने अवैध सागवान तस्करीवर मोठी कारवाई करत तब्बल ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईमुळे परिसरातील लाकूड तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगड सीमेलगतच्या भागातून अवैध सागवान वाहतुकीच्या तक्रारी वन विभागाला सातत्याने प्राप्त होत होत्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. दरम्यान, CG-05-D-1307 क्रमांकाच्या पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली असता वाहनातून अवैधरित्या सागवान चिरान लाकूड वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले.
वन विभागाने तत्काळ वाहनासह सागवान जप्त केला. जप्त मुद्देमालामध्ये पिकअप वाहन व सागवान लाकडाचा समावेश असून त्याची एकूण किंमत सुमारे ९.५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी वाहन चालकासह संबंधितांविरोधात वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
वन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी अशा धडक मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













