धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून निषेध ; इंदिरा गांधी चौकात तीव्र आंदोलन

2

धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून निषेध ; इंदिरा गांधी चौकात तीव्र आंदोलन
– शिवरायांचा अवमान सहन करणार नाही; बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करून महाराष्ट्रात बंदी घालण्याची काँग्रेसची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या असून संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी जोरदार मागणी काँग्रेसने केली.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, इतिहासाची मोडतोड करून स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीची व अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. मात्र, शिवरायांचा अवमान होत असताना त्यांनी मौन बाळगल्याचा आरोप काँग्रेसने केला.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. भविष्यात अशा प्रकारे महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आदिवासी काँग्रेस राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुका अध्यक्ष वसंत राऊत यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here