उष्माघाताचा फटका ; गडचिरोली आरटीओच्या सेवा वेळेत तात्पुरता बदल

9

उष्माघाताचा फटका ; गडचिरोली आरटीओच्या सेवा वेळेत तात्पुरता बदल
-फिटनेस नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी आता सकाळी ७ ते १२, सायंकाळी ४ ते ६
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उष्माघाताच्या धोक्यामुळे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) नूतनीकरण तसेच पक्की अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
नवीन वेळापत्रकानुसार संबंधित सेवा सकाळी ७.०० ते दुपारी १२.०० आणि सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत उपलब्ध राहतील. तर दुपारी १२.०० ते ४.०० या कालावधीत तीव्र उष्णतेमुळे सर्व प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सेवा घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये, तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनी नव्या वेळापत्रकाची नोंद घेऊन आपले नियोजन करावे आणि संबंधित सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #rtogadchiroli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here