महसूल विभागाचा स्तुत्य पुढाकार : कुरखेड्यात वनपट्टाधारक शेतकऱ्यांची ‘फार्मर आयडी’ नोंदणी मोहीम यशस्वी

11

महसूल विभागाचा स्तुत्य पुढाकार : कुरखेड्यात वनपट्टाधारक शेतकऱ्यांची ‘फार्मर आयडी’ नोंदणी मोहीम यशस्वी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २६ : दुर्गम भागातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी कुरखेडा महसूल विभागाने पुढाकार घेत विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन केले. मंडळ अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या शिबिरात तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १५ शेतकऱ्यांची ‘फार्मर आयडी’ नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
वनपट्टाधारक शेतकऱ्यांना अनेकदा तांत्रिक माहितीचा अभाव, कागदपत्रांच्या अडचणी आणि ऑनलाइन प्रक्रियेतील अज्ञानामुळे शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन महसूल विभागाने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत ही मोहीम राबविली.
यावेळी मंडळ अधिकारी नवले यांनी स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे महत्त्व समजावून सांगितले. फार्मर आयडी हा केवळ क्रमांक नसून भविष्यातील विविध कृषी योजना, अनुदान, पीकविमा, कर्जसुविधा आणि शासकीय लाभांसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिबिरात कागदपत्रांची पूर्तता असलेल्या १५ शेतकऱ्यांची जागेवरच नोंदणी करण्यात आली. तसेच नोंदणी प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महसूल सेवक रवींद्र बोदेले तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
यासोबतच तालुक्यातील वनपट्टाधारक तसेच मयत खातेदारांच्या नोंदी आदीवन पोर्टलवर अद्ययावत करण्याचे कामही करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून प्रशासनाच्या ‘थेट बांधावर’ पोहोचणाऱ्या भूमिकेचे कौतुक होत आहे.
या शिबिराला तहसीलदार राहुल पाटील, मंडळ अधिकारी नवले, महसूल सेवक रवींद्र बोदेले, अशोक उईके, शिलाताई ईस्कापे, दिपाली तुलावी तसेच तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here