कढोलीत महसूल विभागाचा ‘ॲग्रीस्टॅक’ उपक्रम वेगात ; १७ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २६ : शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘ॲग्रीस्टॅक’ (AgriStack) प्रकल्पांतर्गत कढोली मंडळ परिसरात शेतकरी नोंदणी मोहिमेला चांगलाच वेग आला असून नुकत्याच राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १७ शेतकऱ्यांची यशस्वी नोंदणी करण्यात आली.
ही मोहीम मंडळ अधिकारी किरंगे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. शेतकऱ्यांना डिजिटल ओळख उपलब्ध करून देणे, तसेच पीक विमा, कृषी कर्ज, अनुदाने आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळवून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
मोहिमेदरम्यान किरंगे यांनी स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ‘ॲग्रीस्टॅक’ प्रणालीवर नोंदणीचे महत्त्व समजावून सांगत आवश्यक कागदपत्रांची जागेवरच पडताळणी करण्यात आली. त्यानंतर संबंधित माहिती तत्काळ पोर्टलवर अद्ययावत करण्यात आली.
मंडळ अधिकारी किरंगे यांच्या नियोजनामुळे संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरळीत आणि जलदगतीने पार पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. महसूल विभागाच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करत अनेक शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
दरम्यान, अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कढोली मंडळात महसूल विभागाच्या या सक्रिय पुढाकारामुळे डिजिटल कृषी क्रांतीकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले असल्याची भावना व्यक्त होत आहे.














