पावसाळ्यापूर्वी पुल पूर्ण करा ; आमदार मसराम यांचा प्रशासनाला कडक आदेश
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २३ : कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील पुल व जोडरस्त्याच्या कामाचा वेग मंदावल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम यांनी कार्यस्थळी धडक देत प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक दिवसांपासून काम सुरू असतानाही अपेक्षित गतीने प्रगती होत नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली.
येत्या काही महिन्यांत पावसाळा सुरू होणार असल्याने नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी पुल व रस्ता काम तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश आमदारांनी दिले. पुल व रस्ता हे स्थानिकांसाठी अत्यावश्यक असून, कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
या पाहणीदरम्यान माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष जिवन पाटील नाट, माजी सभापती गिरीधर तितराम यांची उपस्थिती होती. स्थानिक नागरिकांनीही कामाचा वेग वाढवून दर्जेदार बांधकाम करण्याची मागणी यावेळी पुन्हा अधोरेखित केली.














