आरमोरी : ९.३० लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
– घरातूनच फोफावत होता काळाबाजार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : गडचिरोली जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा काळाबाजार दिवसेंदिवस फोफावत असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा समोर आले आहे. आरमोरी पोलिसांनी अचूक गुप्त माहितीच्या आधारे देऊळगाव परिसरात धडक कारवाई करत तब्बल ९ लाख ३० हजार ९९० रुपयांचा सुगंधित तंबाखू व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी गोपाल हरिराम निंबेकर (वय ३९) व यशवंत विठ्ठल हर्षे (वय ४०) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या घरातूनच हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले आहे.
पोलीस सूत्रांनुसार, दि. १८ एप्रिल रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत आरोपीच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरात तसेच बाहेर उभ्या असलेल्या मारुती वेगेनार (MH 33 AC 6256) वाहनाची तपासणी केली असता विविध ब्रँडचे हुक्का शीशा तंबाखू, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
छाप्यात ‘होल्ला हुक्का’, ‘ईगल’, ‘मजा 108’, ‘विमल पान मसाला’ यांसारख्या उत्पादनांचे शेकडो पाऊच, टिन बॉक्स व पॅकेट्स जप्त करण्यात आले. तसेच तंबाखू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन, मोबाईल फोन व इतर साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोपाल राज, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या नेतृत्वात पार पडली.
आरमोरीत घराघरांतूनच अवैध तंबाखूचा व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट होत असून, पोलिसांनी अशा माफियांविरोधात आणखी कठोर कारवायांचे संकेत दिले आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews














