कोरची तालुक्यात ‘धरती आबा’ योजनेत लाखोंचा घोटाळा? ; विहीर नसतानाही निधी गिळंकृत
The गडविश्व
ता. प्र/कोरची, दि.२१ : आदिवासी बांधवांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या “धरती आबा भगवान बिरसा मुंडा” योजनेत कोरची तालुक्यात मोठ्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत असून, विहीर न बांधताच लाभार्थ्याच्या खात्यात लाखो रुपयांची रक्कम वळती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यातील पांढरापाणी येथील शेतकरी शंकर मारोती मडावी यांना सदर योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली होती. मात्र प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम न होता त्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात आल्याची माहिती पुढे आली. केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे संबंधित रक्कम काढता न आल्यानेच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची गंभीर दखल घेत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी लाभार्थ्याच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “गरीब आदिवासी बांधवांच्या हक्कांवर डाका टाकणाऱ्यांना माफी नाही; दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असा इशारा दिला.
दरम्यान, प्रकरण उघड होताच संबंधित यंत्रणेकडून घाईघाईने विहीर बांधकाम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र “कारवाई आधी, काम नंतर” अशी भूमिका घेत स्थानिक नागरिकांनी ठाम विरोध दर्शविल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रकरणाला तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय अधिक गडद होत असून, “चौकशी झाली, पण कारवाई कधी?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
दरम्यान, कोरची तालुक्यातील बेलारगोंदी येथेही अशाच प्रकारचा गैरव्यवहार यापूर्वी समोर आला होता. अर्धवट विहीर बांधकाम करून पूर्ण निधी वळती करण्यात आल्याची बाब उघड झाल्यानंतर बातमी प्रसिद्ध होताच संबंधित काम तातडीने पूर्ण करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात योजनेच्या अंमलबजावणीवर संशयाचे ढग दाटले आहेत.
या प्रकरणी तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनआक्रोश उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या वेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर तसेच विठ्ठल शेंडे उपस्थित होते.














