पोलिस अधीक्षक निलोत्पल यांची बदली ; गडचिरोलीची कमान आता एम. रमेश यांच्या हाती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेला गती देत ठसा उमटवणारे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज (दि. २०) भा.पो.से. अधिकाऱ्यांच्या बदली व पदस्थापनेबाबत आदेश निर्गमित केले. त्यामध्ये गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचीही बदली-पदस्थापना करण्यात येऊन त्यांची गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर निलोत्पल यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
निलोत्पल यांनी आपल्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी कारवायांना निर्णायक वेग दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक धाडसी ऑपरेशन्स यशस्वीरीत्या पार पडले. यात अनेक नक्षलवादी ठार झाले, तर मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. विशेषतः नक्षल्यांचा प्रमुख मोरक्या म्हणून ओळखला जाणारा भूपती याने आपल्या साथीदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्याची घटना त्यांच्या कार्यकाळातील ठळक यश मानली जाते.
दुर्गम व नक्षलप्रवण भागात पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी निलोत्पल यांनी विशेष प्रयत्न केले. नवीन पोलीस मदत केंद्रे व पोलीस ठाण्यांची उभारणी करून त्यांनी ग्रामीण व अतिदुर्गम भागांमध्ये पोलीस उपस्थिती लक्षणीय वाढवली. त्यांच्या शांत, संयमी आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात पोलीस दलाला यश आले.
दरम्यान, एम. रमेश यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची धुरा स्वीकारली असून त्यांच्या नेतृत्वाखाली नक्षलविरोधी मोहिमेला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निलोत्पल यांच्या बदलीमुळे जिल्हा पोलीस दलात अनुभवी नेतृत्वाची उणीव भासणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #PoliceTransfer #SPTransfer #MaharashtraPolice #NaxalOperations #LawAndOrder #IPS #PoliceNews #BreakingNews #Kolhapur #SecurityForces














