कोरची : खुणारा गाव चमकलं, तीन सख्ख्या बहिणींची एकाचवेळी पोलीस दलात भरती

35

कोरची: खुणारा गाव चमकलं, तीन सख्ख्या बहिणींची एकाचवेळी पोलीस दलात भरती
– आमदार रामदास मसराम यांच्याकडून वडिलांचा सत्कार
The गडविश्व
ता. प्र/ कोरची, दि. १२ : कोरची तालुक्यातील खुणारा या गावाने अभिमानास्पद कामगिरी करत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींनी एकाचवेळी गडचिरोली जिल्हा पोलीस दलात निवड मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशामुळे खुणारा गावासह संपूर्ण तालुक्यात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अश्विनी श्यामलाल कुंभरे (२७), नूतन श्यामलाल कुंभरे (२६) आणि पल्लवी श्यामलाल कुंभरे (२४) या तिन्ही बहिणींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर हे यश संपादन केले. ग्रामीण भागातील मर्यादित साधनसुविधांमध्ये सातत्याने प्रयत्न करत त्यांनी पोलीस भरतीत उल्लेखनीय यश मिळवले.
या ऐतिहासिक यशाबद्दल आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी कुंभरे कुटुंबीयांची भेट घेऊन वडिलांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी तिन्ही बहिणींचे कौतुक करत त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही या यशातून प्रेरणा घेत शासकीय सेवेकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.ग्रामीण भागातील मुलींनी आत्मविश्वास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे हे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या यशामुळे खुणारा गावासह संपूर्ण कोरची तालुक्यात जल्लोषाचे वातावरण असून सर्व स्तरांतून तिन्ही बहिणींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, या यशामुळे परिसरातील युवक-युवतींमध्ये स्पर्धा परीक्षा व शासकीय सेवेकडे आकर्षण वाढत असून विशेषतः मुलींमध्ये आत्मविश्वासाची नवी उभारी निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here