आदर्श कार्यकर्ता घडविण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक : माजी आमदार कृष्णा गजबे
– कुरखेडा मंडलात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६’
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १२ : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६ अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या कुरखेडा मंडलातर्फे श्री भगवान महादेव देवस्थान, अरततोंडी (ता. कुरखेडा) येथे आयोजित दोनदिवसीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले. १२ व १३ एप्रिलदरम्यान सुरू असलेल्या या कार्यशाळेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या प्रशिक्षण शिबिरात सात सत्रांद्वारे कार्यकर्त्यांना पक्षाचा इतिहास, संघटन विस्तार, वैचारिक अधिष्ठान, सरकारची कामगिरी, बुथ व्यवस्थापन तसेच सोशल मीडियाच्या प्रभावी वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी सकाळी नोंदणी व स्वागतानंतर उद्घाटन सत्र पार पडले. त्यानंतर विविध मान्यवरांनी आपापल्या विषयांवर मार्गदर्शन केले.
यामध्ये चंदाताई कोडवते यांनी वैचारिक अधिष्ठान, सदानंद कुथे यांनी पक्षाचा इतिहास व विकास, बाबूराव कोहळे यांनी कार्यविस्ताराची दृष्टी, मधुकर भांडेकर यांनी कार्यपद्धती, तर चेतन कोलते यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर यावर मार्गदर्शन केले.
उद्घाटनप्रसंगी माजी आमदार कृष्णा गजबे म्हणाले, “आदर्श कार्यकर्ता घडविण्यासाठी अशा प्रशिक्षण शिबिरांची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक भक्कमपणा निर्माण होतो आणि बुथस्तरावर पक्ष मजबूत करण्याची दिशा मिळते.”
कार्यक्रमाला भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत वाघरे, महादेव गड देवस्थानचे अध्यक्ष डॉ. ते. ना. बुद्धे, तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, ज्येष्ठ नेते विलास गावंडे, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष बबलू हुसेनी, ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक ॲड. उमेश वालदे, जिल्हा सचिव रूपाली गावडे, महिला शहराध्यक्ष कल्पना मांडवे, महामंत्री प्रा. विनोद नागपूरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांगदेव फाये यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विनोद नागपूरकर यांनी केले.
या कार्यशाळेमुळे कुरखेडा मंडलातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पक्ष विस्तार व स्थानिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.














