कोरचीत बिबट्याची अफवा फोल ; जनावरांवरील हल्ल्यामागे मोकाट कुत्र्यांचा संशय

58

कोरचीत बिबट्याची अफवा फोल ; जनावरांवरील हल्ल्यामागे मोकाट कुत्र्यांचा संशय
The गडविश्व
ता. प्र/ कोरची, दि. २२ : तालुक्यातील कोरची परिसरात दोन दिवसांपूर्वी रात्री जनावरांवर झालेल्या हल्ल्यामुळे बिबट्या फिरत असल्याची भीती नागरिकांमध्ये पसरली होती. मात्र वनविभागाच्या तपासणीनंतर हा हल्ला बिबट्याचा नसून मोकाट कुत्र्यांनी केल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटनेत काही जनावरे जखमी झाली होती. प्रारंभी जखमांचे स्वरूप पाहता बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देत सखोल पाहणी केली.
जखमांचे स्वरूप, पावलांचे ठसे आणि इतर पुरावे तपासल्यानंतर हा हल्ला बिबट्याचा नसून मोकाट कुत्र्यांचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. घटनेची खात्री करण्यासाठी वनविभागाने परिसरात दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून त्याद्वारे सातत्याने निरीक्षण सुरू आहे. आतापर्यंतच्या नोंदींमध्ये बिबट्याच्या हालचालींचा कोणताही पुरावा आढळलेला नाही.
वनपरिक्षेत्र अधिकारी नारनवरे (बेडगाव) यांनी सांगितले की, “घटनेची शहानिशा करण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र अद्याप बिबट्याचे अस्तित्व आढळून आलेले नाही. उपलब्ध पुरावे लक्षात घेता हा हल्ला कुत्र्यांनी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.”
दरम्यान, वनविभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी जनावरांची योग्य काळजी घ्यावी, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ प्रशासनाला कळवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here