गडचिरोलीच्या अतिदुर्गम “बंगाडी”मध्ये २४ तासांत उभारले पोलीस मदत केंद्र

143

गडचिरोलीच्या अतिदुर्गम “बंगाडी”मध्ये २४ तासांत उभारले पोलीस मदत केंद्र
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील भामरागड उपविभागातील अतिदुर्गम बंगाडी येथे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अवघ्या २४ तासांत अत्याधुनिक पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले. सुमारे १००० सी-६० कमांडो, १८ बीडीडीएस पथके, नवनियुक्त पोलीस जवान, ५०० विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कामगिरी पार पडली.
छत्तीसगड सीमेपासून अवघ्या २ किमी अंतरावर आणि लाहेरी उपपोस्टेपासून ८ किमी अंतरावरील या दुर्गम भागात उभारण्यात आलेले हे मदत केंद्र सुरक्षा आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सन २०२३ पासून सुरू असलेल्या सुरक्षा पोकळी कमी करण्याच्या साखळीतील हे ११ वे पोलीस मदत केंद्र आहे.
या केंद्राच्या स्थापनेमुळे स्थानिक नागरिकांपर्यंत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षमपणे पोहोचणार असून, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मोठी चालना मिळणार आहे. यापूर्वी फुलनार-गुंडुरवाही (२३ नोव्हेंबर २०२५), तुमरकोठी (१९ डिसेंबर २०२५) आणि बिनागुंडा (२४ जानेवारी २०२६) येथेही नवीन पोलीस सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
पोलीस मदत केंद्र उभारणीसाठी सुमारे १०५० मनुष्यबळासह ४ जेसीबी, ८ ट्रेलर, २ पोकलेन व २० ट्रक यांचा वापर करण्यात आला. केंद्रात १५ पोर्टा कॅबिन, वायफाय सुविधा, जनरेटर शेड, आरओ प्लांट, मोबाईल टॉवर, स्वच्छतागृह, मॅक वॉल, बीपी मोर्चा व सँड मोर्चे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत.
सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे अधिकारी व अंमलदार, एसआरपीएफ, तसेच सीआरपीएफच्या १९२ बटालियनचे जवान तैनात करण्यात आले आहेत. विशेष अभियान पथकांचे ८ पथक (२०० कमांडोज)ही सज्ज ठेवण्यात आले आहेत.
उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित जनजागरण मेळाव्यात स्थानिक नागरिकांना साड्या, धोतर, ब्लॅंकेट, स्वयंपाक भांडी, मच्छरदाणी, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच युवकांना क्रीडासाहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास वाढला आहे.
वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्यात या भागात राष्ट्रीय महामार्ग, पूल, मोबाईल टॉवर तसेच गुंडेनूर नाल्याच्या बांधकामांना गती मिळणार आहे. तसेच एस.टी. बससेवा सुरू करण्यासही मार्ग मोकळा होणार आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, “या मदत केंद्रामुळे नागरिकांपर्यंत सुरक्षा आणि विकास अधिक प्रभावीपणे पोहोचेल आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल.”
उद्घाटन कार्यक्रम विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उप-महानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कमांडंट परविंदर सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here