मालेवाडा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ उत्साहात संपन्न

4

मालेवाडा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ उत्साहात संपन्न
– शेकडो नागरिकांना योजनांचा थेट लाभ
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १८ : तालुक्यातील मालेवाडा येथे तहसील कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ शिबिर उत्साहात व मोठ्या प्रतिसादात पार पडले. या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व सेवा थेट जनतेच्या दारात पोहोचवण्यात आल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी मालेवाडा येथील सरपंच सौ. अनुसया पेंदाम होत्या. यावेळी नायब तहसीलदार राजकुमार धनवाते, वैभव आंबेकर, सत्यनारायण अनमदवार, माजी जि.प. सदस्य गीताताई कुमरे, तालुका आरोग्य अधिकारी शहाणे, कृषी अधिकारी रूपाली जाधव, माजी पं.स. उपसभापती श्रीराम दुगा, विस्तार अधिकारी भोंगे साहेब, वनस्कर मॅडम, कोकोडीच्या सरपंच पंगारा मॅडम, चराविदंडचे सरपंच गोपाल कुमरे, केंद्रप्रमुख हेमंत सुकारे तसेच पोलीस उपनिरीक्षक आकाश नाईकवाडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. जात, अधिवास (डोमिसाईल), उत्पन्न व शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांचा लाभ देण्यात आला. भोगवटादार वर्ग-१ मंजुरी आदेश, कसायमुक्ती योजना, नाव दुरुस्ती आदेश आणि घरकुल धारकांना ५ ब्रास मोफत रेती वाटप आदेशही वितरित करण्यात आले.
याशिवाय, आरोग्य विभागामार्फत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मालेवाडा मंडळातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी प्रविण नैताम यांनी केले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मालेवाडा मंडळ व तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here