नागपूर पदवीधर निवडणुकीची तयारी : धानोऱ्यात कोहळे यांनी घेतला नोंदणीचा आढावा

48

नागपूर पदवीधर निवडणुकीची तयारी : धानोऱ्यात कोहळे यांनी घेतला नोंदणीचा आढावा
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १२ : आगामी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धानोरा तालुक्यात पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयात पार पडली. बैठकीस माजी आमदार सुधाकरजी कोहळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र पदवीधरांची मतदार म्हणून नोंदणी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे सह-नोंदणी प्रमुख सुधीर दिवे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोंदणी प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, आवश्यक कागदपत्रे तसेच नियमावलीबाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्येक पात्र पदवीधरापर्यंत पोहोचून त्यांचा नोंदणी अर्ज भरून घेणे ही संघटनात्मक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार सुधाकरजी कोहळे म्हणाले की, “पदवीधर मतदार हा निवडणुकीचा कणा असतो. त्यामुळे एकही पात्र पदवीधर नोंदणीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी.”
या बैठकीचे आयोजन भाजप तालुकाध्यक्ष साजनभाऊ गुंडावार यांनी केले होते. त्यांच्या नियोजनामुळे तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. बैठकीत उत्साहपूर्ण वातावरणात चर्चा झाली.
धानोरा नगरपंचायतीतील प्रत्येक प्रभागात जाऊन पदवीधरांच्या गाठीभेटी घेणे तसेच विहित मुदतीत जास्तीत जास्त नोंदणी पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. “प्रत्येक पदवीधर, मतदार नोंदणीसाठी सज्ज” हे ब्रीद समोर ठेवून पुढील काही दिवस हे अभियान युद्धपातळीवर राबवण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here