गडचिरोली जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा, कृत्रिम तुटवडा व काळाबाजार केल्यास कडक कारवाई : जिल्हाधिकारी पंडा

81

गडचिरोली जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा, कृत्रिम तुटवडा व काळाबाजार केल्यास कडक कारवाई : जिल्हाधिकारी पंडा
– गॅसचा अवैध साठा रोखण्यासाठी तालुकानिहाय १२ विशेष दक्षता पथके नियुक्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती किंवा इतर कारणांचा आधार घेत कृत्रिम तुटवडा असल्याचे भासवणे, अफवा पसरवणे अथवा गॅस सिलेंडरचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यात कार्यरत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) या कंपन्यांच्या वितरकांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक गोकुल, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे तसेच हिंदुस्तान पेट्रोलियमचे जिल्हा मुख्य वितरक आकाश गौर यांच्यासह संबंधित वितरक उपस्थित होते.
बैठकीत वितरकांनी जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाला दिली. सध्या व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरवर काही निर्बंध लागू करण्यात आले असले तरी शैक्षणिक संस्था, आश्रमशाळा, रुग्णालये आदी अत्यावश्यक सेवांसाठी प्राधान्याने सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच सर्व गॅस वितरकांनी आपल्या संबंधित कंपनीशी समन्वय ठेवून गॅस पुरवठा सुरळीत ठेवावा आणि अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले. नागरिकांनी अनावश्यक घाबरून साठेबाजी टाळावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गॅसची अवैध साठवणूक, गैरवापर व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तालुकानिहाय १२ विशेष दक्षता व फिरती पथके नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक पथकात निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक व कनिष्ठ लिपिक यांचा समावेश असून ही पथके जिल्ह्यातील इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम तसेच इतर एलपीजी एजन्सींची तपासणी करणार आहेत.
तपासणीदरम्यान घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा, व्यावसायिक कामासाठी गैरवापर किंवा ग्राहकांकडून विहित दरापेक्षा अधिक दर आकारणी आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कठोर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच तपासणी व कारवाईचा दैनिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे संबंधित पथकांना बंधनकारक करण्यात आले असून संपूर्ण प्रक्रियेवर संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांचे नियंत्रण राहणार आहे.
नागरिकांच्या अडचणी व तक्रारींसाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या 07132-222007 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #LPGSupply #GasCylinder #GasAvailability #BlackMarketing #DistrictAdministration #CollectorOrder #PublicAlert #EssentialCommodities #SupplyDepartment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here