भेंडाळा परिसरातील सुपीक जमीन अधिग्रहणाविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडन आंदोलन

61

भेंडाळा परिसरातील सुपीक जमीन अधिग्रहणाविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडन आंदोलन
-शेतकऱ्यांच्या लढ्याला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यास ‘जेल भरो’चा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात जेएसडब्ल्यू प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आली असून या निर्णयाविरोधात स्थानिक शेतकरी व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुपीक शेतजमीन उद्योगासाठी अधिग्रहित करू नये, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने आज, १२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा दिला असून प्रशासनाने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेसच्या वतीने आगामी काळात ‘जेल भरो आंदोलन’ उभारण्यात येईल, अशी चेतावणी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत कोवासे, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखा पठाण, नेताजी गावतुरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, अनिल कोठारे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, प्रभाकर वासेकर, परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, श्रीनिवास ताडपलीवार, संजय गावडे, संजय चन्ने, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, धीवरू मेश्राम, हेमंत मोहितकर, स्वप्निल बेहेरे, कल्पना नंदेश्वर, कविता उराडे, पौर्णिमा भडके, रिता गोवर्धन, मंजू आत्राम, मीनल चिमूरकर, शीतल ठवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भेंडाळा परिसरातील सुपीक जमीन उद्योगासाठी अधिग्रहित करण्याच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून आज होणाऱ्या आंदोलनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here