कोरची : आठ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पाच दिवसांनंतर धक्कादायक प्रकार उघड
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ११ : तालुक्यात आठ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, होळीच्या दिवशी गावात मुले रंग खेळत होती. त्यावेळी आरोपी मोनुकुमार ढेक (वय २२) याने एका आठ वर्षीय
चिमुकलीला फूस लावून आपल्या घरी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर चिमुकली घरी परतली मात्र काही दिवसांनी आई तिला आंघोळ घालत असताना तिच्या पोटात दुखत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी आईने विचारणा केली असता चिमुकलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आपबीती सांगितली.
यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ कोरची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली. आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित चिमुरडी अनाथ असून, तिचा सांभाळ तिचे मामा-मामी अत्यंत मायेने करत आहेत. होळीच्या दिवशी गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना, आरोपीने या निरागस बालिकेला फूस लावून स्वतःच्या घरात नेले.रक्ताच्या नात्यातील असलेल्या या २२ वर्षीय तरुणाने तिथे तिच्या असहायतेचा फायदा घेत, तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही, तर हा प्रकार कोणाला सांगितला, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच, कोरची पोलिसांनी वेगाने हालचाली करत, नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ रोजी पोलिसांनी जेरबंद केले, ९ रोजी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पो.नि. शैलेंद्र ठाकरे यांनी दिली. उपनिरीक्षक योगेश पवार तपास करत आहेत.














