श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, कुरखेडाचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात प्रथम क्रमांक
– ११ लाखांचे बक्षीस जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : आदिवासी बहुल ग्रामीण भागातील शिक्षणाला नवा आयाम देत कुरखेडा येथील श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, कुरखेडा यांनी राज्यस्तरीय पातळीवर मानाचा तुरा मिळवला आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत शाळेला तब्बल ११ लाख रुपयांचे आकर्षक बक्षीस जाहीर झाले आहे.
या अभियानांतर्गत शाळांच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, शैक्षणिक गुणवत्ता, शासन धोरणांची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचे नाविन्यपूर्ण उपक्रम आदी निकषांवर काटेकोर मूल्यमापन करण्यात आले. तालुकास्तरावर अव्वल ठरल्यानंतर जिल्हास्तरीय समितीने शाळेची सखोल पाहणी केली.
तीन मजली दिमाखदार इमारत, आकर्षक शैक्षणिक रंगरंगोटी, परसबाग व वृक्षलागवड, भव्य क्रीडांगण, ‘कला-संस्कार’ डिजिटल वार्षिक महोत्सव, मूल्य शिक्षणावर भर, पारदर्शी नियोजन, विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धती, करिअर मार्गदर्शन उपक्रम तसेच माजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग यांची विशेष दखल समितीने घेतली. उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण आणि स्वच्छ, सुबक परिसरामुळे श्रीराम विद्यालयाने जिल्ह्यात प्रथम स्थान पटकावले.
शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६ (महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) अंतर्गत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. खाजगी व्यवस्थापनांतर्गत चालणाऱ्या या संस्थेने ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत राज्य पातळीवर आपली छाप उमटवली आहे.
प्राचार्य नागेश्वर दोषहर फाये यांनी सांगितले की, संस्था अध्यक्ष मोहनरावजी अरमरकर, कोषाध्यक्ष व शाळा समिती अध्यक्ष वामनरावजी फाये, संस्था सचिव दोषहरराव फाये, शाळा समिती सदस्य चांगदेव फाये यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी संघ व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे यश शक्य झाले. विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम, पारदर्शक नियोजन आणि विद्यार्थीहिताची भूमिका यामुळेच आजचा मान मिळाला, असे त्यांनी नमूद केले.
या यशाबद्दल परिसरातील नागरिक, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, गडचिरोली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. आदिवासी ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करत श्रीराम विद्यालयाने इतर शाळांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.














