बेडगावच्या मंडईत दारूविक्रीचा कट उधळला : देशी-विदेशी दारूसह हातभट्टी उद्ध्वस्त

84

बेडगावच्या मंडईत दारूविक्रीचा कट उधळला : देशी-विदेशी दारूसह हातभट्टी उद्ध्वस्त
– गाव संघटना–मुक्तीपथ–पोलीस यांची संयुक्त धडक
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या कोरची तालुक्यातील बेडगाव येथे मंडईच्या निमित्ताने अवैध दारूविक्रीचा डाव रचणाऱ्या विक्रेत्यांचा कट गाव संघटना, मुक्तीपथ आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाईत हाणून पाडला. या धडक कारवाईत देशी-विदेशी दारू, मोहफुलाचा सडवा, तयार हातभट्टी दारू व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
बेडगावमध्ये गेल्या चार महिन्यांपासून गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे दारूबंदी यशस्वीपणे राबवली जात असून गावात शांतता व सुव्यवस्था नांदत आहे. मात्र, मंडई या पारंपरिक सणाच्या गर्दीचा गैरफायदा घेत काही दारूविक्रेत्यांनी गुप्तपणे देशी व विदेशी दारू विक्रीसाठी साठा आणल्याची माहिती गावातील सक्रिय कार्यकर्त्यांना मिळाली. ही माहिती मिळताच मुक्तीपथ व गाव संघटनेने तत्काळ हालचाली करत पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला.
संयुक्त कारवाईदरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने देशी व विदेशी दारूचा साठा, दोन ड्रम मोहफुलाचा सडवा, दहा लिटर तयार हातभट्टी दारू तसेच दारू गाळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे मंडईच्या काळात दारूविक्री करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे उधळून लावण्यात आला.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी मुक्तीपथचे तालुका संघटक धर्मेंद्र बोपचे, प्रेरक भूषण डोकरमारे, गावाचे सरपंच, उपसरपंच, गाव संघटनेचे सदस्य, सक्रिय कार्यकर्ते तसेच पोलीस प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या ठोस व धाडसी कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, “गावात दारूबंदी कायम ठेवण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here