कुरखेड्यात पत्रकार भवनाचे स्वप्न साकार ; सुसज्ज इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

78

कुरखेड्यात पत्रकार भवनाचे स्वप्न साकार ; सुसज्ज इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
The गडविश्व
ता प्र / कुरखेडा, दि. ०३ : शहरातील पत्रकारांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून, नगरपंचायत स्थानिक विकास निधी अंतर्गत तहसील कार्यालयासमोर नियोजित जागेवर सुसज्ज पत्रकार भवन (समाज भवन) उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आज नगरपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडले असून, यानिमित्ताने प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यात आली.
शहरात पत्रकारांसाठी विविध कार्यक्रम, बैठका व पत्रकार परिषदांसाठी जागा आरक्षित होती; मात्र स्वतंत्र आणि कायमस्वरूपी इमारत नसल्याने पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक पत्रकार संघटनेने नगरपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत नियोजित जागेवर पत्रकार भवन उभारणीस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे कुरखेड्यातील पत्रकारांना आता हक्काचे, सुसज्ज आणि स्थायी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी नगराध्यक्ष अनिताताई बोरकर, उपाध्यक्ष बबलूभाई हुसेनी, पाणीपुरवठा सभापती आशीष काळे, महिला व बालकल्याण सभापती प्रचिताई धोंडणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांच्यासह नगरसेवक जयेंद्रसिंह चंदेल, अतूल झोळे तसेच नगरसेविका दुर्गाताई गोटेफोडे, आशाताई तुळावी, हेमलता नंदेश्वर, कुंदाताई तितिरमारे, जयश्रीताई रासेकर, कांताबाई मठ्ठे उपस्थित होत्या.
यावेळी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नासीर हाशमी, माजी अध्यक्ष सिराज पठाण, विनोद नागपूरकर, चेतन गहाणे, ताहिर शेख यांच्यासह कंत्राटदार न्याज सय्यद, अभियंता खापरे, नगरपंचायत कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार भवनाच्या उभारणीमुळे पत्रकारांच्या बैठका, पत्रकार परिषद, प्रशिक्षण व विविध सामाजिक उपक्रमांसाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असून, या निर्णयाचे पत्रकार बांधवांनी स्वागत करत नगरपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहेत.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here