कठडे नसलेला पूल ठरला मृत्यूचा सापळा ; टी-शर्ट अडकून युवकाचा दुर्दैवी अंत
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३१ : शेताकडे जात असताना तोल जाऊन पुलावरून खाली पडल्याने लोखंडी अँगलला टी-शर्ट अडकून गळ्याला फास लागल्याने एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धानोरा तालुक्यातील सोडे येथे शुक्रवार, ३० जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सुखदेव जणू हलामी (वय ३२, रा. सोडे) असे मृत युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुखदेव हा आई व एका भावासोबत सोडे येथे राहत होता. शुक्रवारी सकाळी सुमारे नऊ वाजताच्या सुमारास तो घरातून शेताकडे निघाला होता. त्याचे शेत नदीपलीकडे असल्याने तो सोडे येथील कठाणी नदीवरील पुलाच्या काठाने जात होता. सदर पुलाला कठडे नसल्याने अचानक तोल गेल्यामुळे तो पुलावरून खाली कोसळला. यावेळी त्याच्या अंगावरील टी-शर्ट पुलावरील लोखंडी अँगलला अडकला.
या घटनेत टी-शर्ट फाटून तो गळ्याभोवती आवळला गेला आणि त्यातच सुखदेवचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील संदीप परसा यांना माहिती दिली. पोलीस पाटीलांनी घटनेची माहिती धानोरा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या घटनेचा अधिक तपास धानोरा पोलीस करीत असून, या दुर्घटनेमुळे सोडे गावात शोककळा पसरली आहे. तसेच कठडे नसलेल्या पुलांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त होत आहे.













