लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे धानोरा तालुक्याचा विकास ठप्प

157

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे धानोरा तालुक्याचा विकास ठप्प
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३१ : गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर असलेला आदिवासीबहुल धानोरा तालुका आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहे. सुमारे ७५ टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या अतिदुर्गम व डोंगराळ तालुक्याकडे शासन आणि लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने तालुक्याचा सर्वांगीण विकास रखडल्याची तीव्र भावना जनतेत व्यक्त होत आहे.
शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे बहुसंख्य आदिवासी काबाडकष्ट, शेतमजुरीवर अवलंबून असून विविध समस्यांनी ग्रस्त या तालुक्याचा वाली कुणीच नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकांच्या काळात नेतेमंडळी आदिवासी जनतेशी गोड बोलून आश्वासनांची खैरात करतात; मात्र निवडणुका संपताच या आश्वासनांचा विसर पडतो, अशी खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर वसलेल्या या उद्योगविरहित तालुक्यात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही विकासाची गंगा पोहोचलेली नाही. शेतकऱ्यांसाठी बाजारपेठांचा अभाव, सिंचन सुविधांची कमतरता, बेरोजगारी, अपुरे व निकृष्ट रस्ते, सार्वजनिक वाहतुकीचा अभाव, अपुऱ्या आरोग्य सुविधा, डॉक्टर व औषधांचा तुटवडा या समस्या आजही कायम आहेत.
आदिवासींसाठी असलेल्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी मधेच गडप होत असल्याचा आरोप होत असून अडाणी व निरक्षर आदिवासींची लुबाडणूक होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष ठोसपणे पुढे येताना दिसत नाही.
कुरखेडा मार्गावरील नाल्यावर पावसाळ्यात पाणी वाहत असल्याने वारंवार वाहतूक खोळंबते, तर पिसेवडधा–रागी मार्गावरील नदीवर पूल नसल्याने या मार्गावरील संपर्क तुटतो. या गंभीर बाबींकडे ना मंत्री ना वरिष्ठ अधिकारी लक्ष देत असल्याची नाराजी आहे.
धानोऱ्यापासून ४५ किलोमीटर अंतरावरील टिप्पागड हे ऐतिहासिक प्राचीन स्थळ असूनही विकासापासून वंचित आहे. अनेक खेड्यांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही, तर सततच्या वीज खंडित पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक गावांमध्ये एस.टी. बससेवा नसून अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरण व आदिवासी जीवन धोक्यात आले आहे.
दुर्गम भागात शाळा, आरोग्य केंद्रे, अंगणवाड्या उभारल्या असल्या तरी इंटरनेटच्या अभावामुळे कर्मचारी काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून बेरोजगार युवक रोजगारासाठी स्थलांतर करण्यास मजबूर आहेत.
एकूणच जीवनावश्यक सुविधांपासून वंचित असलेल्या या आदिवासी तालुक्याकडे शासन व लोकप्रतिनिधी कधी लक्ष देतील, असा संतप्त सवाल धानोरा तालुक्यातील जनता आजही करीत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here