कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छता ; कचऱ्याचे ढीग व अंधाऱ्या रस्त्यामुळे रुग्णांचे हाल

72

कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छता ; कचऱ्याचे ढीग व अंधाऱ्या रस्त्यामुळे रुग्णांचे हाल
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १० : कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव आणि मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था उघडकीस आली असून, त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालय परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून, दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत आहे.
विशेष चिंतेची बाब म्हणजे गर्भवती महिलांच्या ये-जा करण्यासाठी वापरला जाणारा जुना पायवाट अत्यंत खराब अवस्थेत आहे. या रस्त्यावर प्रकाशाची कोणतीही व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना जीव धोक्यात घालून रुग्णालयात पोहोचावे लागत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू हुसेनी आणि नगरसेवक जयेंद्र चंदेल यांनी आज उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करत स्वच्छता व्यवस्था तातडीने सुधारण्याची तसेच गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी जुना पायवाट दुरुस्त करून त्यावर एलईडी दिवे बसविण्याची ठाम मागणी केली.
यावेळी उपाध्यक्ष बबलू हुसेनी म्हणाले, रुग्णालय हे आरोग्यसेवेचे केंद्र असते मात्र येथे स्वच्छता आणि सोयी-सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. विशेषत: गर्भवती महिलांसाठी रात्रीचा मार्ग धोकादायक आहे. ही कामे तात्काळ पूर्ण झाली पाहिजेत.
नगरसेवक जयेंद्र चंदेल यांनीही नाराजी व्यक्त करत नगरपंचायत व आरोग्य विभागाने समन्वयाने काम करून ही समस्या कायमची सोडवावी. रुग्णांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.
या पाहणीवेळी रोहिदास निपाने उपस्थित होते. दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here