जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी नेतृत्वाची एकजूट आवश्यक : जराते
The गडविश्व
एट्टापल्ली, दि. ०८ : बळजबरीने जंगल नष्ट करून खाणकाम करण्याविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्ष, डावी लोकशाही आघाडी व ग्रामसभांच्या वतीने संघर्ष सुरू असतानाच, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी नेतृत्वाने पुढाकार घेत सर्व घटकांना एकत्र आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केले.
सुरजागड येथील ठाकूरदेव यात्रेच्या दुसऱ्या दिवशी जराते परिवार व डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने आयोजित सहविचार बैठक व स्नेहभोजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री व अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आदिवासी संस्कृती, परंपरा व नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करत विकास साधण्यावर भर दिला जाईल. अपवादात्मक कारणे वगळता स्थानिकांच्या हक्कांना धक्का न लावता निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाकूरदेव देवस्थानासह एट्टापल्ली तालुक्यातील विविध विकासकामांसाठी लवकरच मोठा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही आमदार आत्राम यांनी दिली.
कार्यक्रमास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम, हर्षवर्धनबाबा आत्राम, एट्टापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार, माजी जि.प. सदस्य संजय चरडुके, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, शिवसेना (उबाठा) चे विवेक बारसिंगे यांच्यासह विविध पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या हस्ते ‘गाव गणराज्याचा संघर्ष’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. ही पुस्तिका ठाकूरदेव यात्रेदरम्यान भाविकांमध्ये मोफत वितरित करण्यात आली. ग्रामसभांचे नेते व आदिवासी विकास महामंडळाचे संचालक सैनू गोटा, गोपाल उईके, शिलाताई गोटा, ॲड. लालसू नरोटे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, सहसचिव काॅ. ॲड. जगदीश मेश्राम, काॅ. विनोद झोडगे, काॅ. सचिन मोतकुरवार, काॅ. सुरज जक्कूलवार, राहुल येमूलवार, प्रकाश बन्सोड, विनोद मडावी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देऊन सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा कविता ठाकरे, संगिता चांदेकर, विद्याताई गोहणे, भाई चंद्रकांत भोयर, बाजीराव आत्राम, योगेश चापले, अक्षय कोसनकर, चिरंजीव पेंदाम, सतिश दुर्गमवार, आकाश आत्राम, लक्ष्मण वेळदा, रमेश आतलामी, राजेश तलांडे, सुरज ठाकरे व आशिष नेवारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #TribalLeadership #InclusiveDevelopment #Gadchiroli #Surajgarh #ThakurdevYatra #LeftDemocraticAlliance #FarmerWorkerParty #AdivasiRights #SustainableDevelopment #GrassrootsDemocracy













