अपुऱ्या आरोग्य सुविधांचा बळी ; गरोदर मातेच्या मृत्यूविरोधात काँग्रेसचे ७ जानेवारीला धरणे आंदोलन

46

अपुऱ्या आरोग्य सुविधांचा बळी ; गरोदर मातेच्या मृत्यूविरोधात काँग्रेसचे ७ जानेवारीला धरणे आंदोलन
The गडविश्व
गडचिरोली, दि.०५ : दुर्गम व मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था व पायाभूत सुविधा अद्यापही तोकड्याच असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. अपुऱ्या रस्ते व आरोग्य सुविधांमुळे नुकताच एका गरोदर मातेचा व तिच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, या घटनेमुळे जिल्ह्यातील प्रशासनाच्या उदासीनतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीकडे विशेष लक्ष देण्याची घोषणा केली असली, तरी अतिदुर्गम भागातील नागरिकांना आजही मूलभूत आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी व आदिवासी नागरिकांना याचा मोठा फटका बसत असून, वेळेवर उपचार व वाहतूक सुविधा नसल्याने जीव गमवावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित गरोदर मातेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था तातडीने सक्षम करावी, अतिदुर्गम भागांना जोडणारे रस्ते व वाहतूक सुविधा सुधाराव्यात, तसेच मृत गरोदर मातेच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी ठोस मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आपला रोष व्यक्त करावा, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here