शेतकऱ्यांना मोठा दिलासा : २ लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ

109

शेतकऱ्यांना मोठा दिलासा : २ लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३ : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने कृषी क्षेत्राला मोठे बळ दिले आहे. महसूल व वन विभागाने १ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या विशेष राजपत्रानुसार, शेतकऱ्यांनी घेतलेल्या २ लाख रुपयांपर्यंतच्या शेती व पीक कर्जाशी संबंधित सर्व कायदेशीर कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले आहे. हा निर्णय १ जानेवारी २०२६ पासून अंमलात आला आहे.
या निर्णयामुळे पीक कर्जासाठी आवश्यक असलेले करारनामे, हक्कविलेख निक्षेप, तारण गहाणखत, हमीपत्र, गहाण सूचनापत्र किंवा घोषणापत्र अशा कोणत्याही संलेखावर आता शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. परिणामी, कर्ज प्रक्रियेत येणारा अतिरिक्त आर्थिक भार कमी होणार असून, विशेषतः अल्पभूधारक व गरजू शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शासनाचा हा निर्णय कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे त्यांनी नमूद केले आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, शेती उत्पादन व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here