गडचिरोली : दारूच्या नशेत चालक, मलेरिया बाधित चिमुकलीसह रुग्णवाहिका उलटली
– चालकावर कठोर कारवाईची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०२ : रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार धानोरा तालुक्यात समोर आला आहे. मलेरिया बाधित चिमुकलीला उपचारासाठी नेत असताना दारूच्या नशेत असलेल्या चालकामुळे रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली तरी आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रीडवाई गावातून मलेरिया बाधित दोन ते अडीच वर्षांची चिमुकली उर्फिता आशिष कोराम हिला तिची आई सोनी आशिष कोराम यांच्यासह रुग्णवाहिका क्रमांक MH 33 T 1716 (महिंद्रा) मधून मुरुमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जात होते. दरम्यान, रीडवाई ते मुरुमगाव मार्गावर चालक विलास उसेंडी हा दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला पलटी झाली.
या अपघातात चिमुकली रुग्ण व तिची आई जखमी झाल्या असून, दोघांवर मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
दारूच्या नशेत वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा असून, त्यातही रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनाचा समावेश असल्याने संबंधित चालकावर तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणात नेमकी कोणती कायदेशीर कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
अपघातानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता काही पत्रकारांकडून उद्धट वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जनसेवा वैद्यकीय अधिकारी व दवाखान्यातील कर्मचाऱ्यांकडून या घटनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दारूच्या नशेत रुग्णवाहिका चालविणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून, रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या चालकावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #DrunkDriving #AmbulanceAccident #MedicalNegligence #PublicHealthSafety
#PatientSafety #RoadSafety #HealthSystemFailure
#EmergencyServices #MalariaPatient #HealthcareNegligence #EndDrunkDriving #SaveLives













