रेझिंग डे निमित्त गडचिरोली पोलीस दलाचे भव्य पथसंचलन
– पोलीस दलाच्या विविध शाखांसह ३५० शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त २ ते ८ जानेवारीदरम्यान रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत असून, या सप्ताहाच्या प्रारंभानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज शहरात भव्य व शिस्तबद्ध पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले.
आज सकाळी १० वाजता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत हे पथसंचलन पार पडले. कारगील चौकातून पथसंचलनास प्रारंभ होऊन इंदिरा गांधी चौकात त्याची सांगता करण्यात आली. या पथसंचलनातून वाहतूक नियम, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा तसेच सामाजिक जनजागृतीसंदर्भातील विविध संदेश फलकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
रेझिंग डे सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपपोस्टे व पोकमें येथे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शस्त्र प्रदर्शन, पोलीस दलाची माहिती, सायबर गुन्हे व महिला सुरक्षेविषयी मार्गदर्शन, स्वच्छता अभियान तसेच इतर सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे.
आजच्या पथसंचलनामध्ये ध्वजवाहक पथक, पोलीस मुख्यालय महिला प्लाटून, विशेष अभियान पथकाचे प्लाटून, बँड पथक, शालेय विद्यार्थी, श्वान पथक, बीडीडीएस पथक तसेच एमपीव्ही वाहनांचा समावेश होता. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोली, पोलीस स्टेशन गडचिरोली, पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, विशेष अभियान पथक, सिव्हिक अॅक्शन, प्रोपागंडा, श्वान पथक, बीडीडीएस, सीटीसी, सायबर सेल, भरोसा सेल आदी विविध शाखांचे अधिकारी व अंमलदार पथसंचलनात सहभागी झाले होते.
याशिवाय शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळा, महिला महाविद्यालय, राणी दुर्गावती हायस्कूल, गोंडवाना सैनिक विद्यालय, शिवाजी हायस्कूल व वसंत विद्यालय, गडचिरोली येथील एकूण सुमारे ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या पथसंचलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सदर कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, पोलीस उप-अधीक्षक (गृह) स्वप्निल ईज्जपवार, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन गडचिरोली विनोद चव्हाण, राखीव पोलीस उपनिरीक्षक दिवाकर सहारे यांच्यासह विविध शाखांचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.













