गडचिरोली : अबब… शासकीय योजनेतील विहीरच गेली चोरीला! अधिकाऱ्यांच्या पाठीशी नेमकं कोण?
– कोरची तालुक्यात ‘जाऊ तिथे खाऊ’ चित्रपट जिवंत वास्तवात
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा – कोरची (चेतन गहाणे) दि. १९ : मध्यंतरी प्रदर्शित झालेल्या ‘जाऊ तिथे खाऊ’ या चित्रपटात शासकीय योजनेतील चक्क विहीरच चोरीला गेल्याचा विनोदी पण बोचरा प्रकार दाखवण्यात आला होता. मात्र, तोच प्रकार आता गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोरची तालुक्यात प्रत्यक्षात घडल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुका मुख्यालयापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरापाणी येथील आदिवासी शेतकरी शंकर मन्हेर मडावी यांच्या नावाने धरती आबा भगवान बिरसा मुंडा शेतकरी जलसिंचन योजना अंतर्गत विहीर मंजूर करण्यात आली होती. मात्र, विहिरीचे कोणतेही प्रत्यक्ष बांधकाम न करता थेट ३,८२,५६३ रुपये लाभार्थ्याच्या खात्यात वळती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
ही बाब लक्षात येताच तक्रार दाखल करण्यात आली. चौकशीही पार पडली. चौकशी अधिकाऱ्यांनी लाभार्थ्याच्या शेतात विहिरीचे बांधकाम झालेले नसल्याचे स्पष्टपणे नमूद करत संपूर्ण अहवाल शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. तरीदेखील, इतक्या गंभीर प्रकरणात आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, लाभार्थ्याच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी काही व्यक्ती शेतकऱ्याच्या दारात हजर झाल्या होत्या आणि त्याला रक्कम देण्याचे आमिषही दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, हे पैसे कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून काढले जात होते, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
चौकशी पूर्ण, तरी कारवाई कासवगतीने?
चौकशी पूर्ण होऊनही कारवाई का होत नाही? संबंधित अधिकारी अजूनही मोकाट कसे? या प्रकरणामागे नेमके कोणते ‘अदृश्य हात’ कार्यरत आहेत? असे अनेक प्रश्न कोरची तालुक्यातील आदिवासी जनतेच्या मनात उभे राहिले आहेत.
एक विहीर नव्हे, अनेक घोटाळ्यांची शक्यता
हे प्रकरण अपवाद नसून, तालुक्यात अशाच स्वरूपाचे इतर प्रकारही घडल्याची चर्चा आहे. शासनाच्या नावाखाली आदिवासी शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा लाटणाऱ्यांवर कधी कारवाई होणार? असा संतप्त सवाल आता जनतेकडून उपस्थित होत आहे.
आदिवासी जनतेचा आक्रोश
इतका गंभीर भ्रष्टाचार समोर येऊनही जर प्रशासन मौन बाळगत असेल, तर गरिब आदिवासींनी न्यायासाठी कुणाकडे दाद मागायची? असा प्रश्न कोरची तालुक्यातील जनतेच्या मनात घर करून बसला आहे.
“माझ्या शेतात आजतागायत विहिरीचे बांधकाम झालेले नाही. मात्र एक दिवस काही लोक माझ्या खात्यातून पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी मला एक लाख रुपये देण्याचे सांगितले, पण ते पैसे कशासाठी आहेत, हे कधीच सांगितले नाही.”
— शंकर मडावी, आदिवासी शेतकरी, पांढरापाणी
कठोर कारवाईची मागणी
या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच कोरची तालुक्यातील सर्व शासकीय विहीर योजनांचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #korchi #Gadchiroli #Korchitaluka #WellScam #GovernmentSchemeScam #CorruptionExposed #TribalRights #AdivasiIssues #PublicMoneyLoot #AccountWithoutWell #FakeDevelopment #InquiryWithoutAction #WhoIsProtectingThem #JusticeForFarmers #ExposeCorruption














