जागतिक मृदा दिन : शाश्वत शेतीसाठी माती संवर्धन अत्यावश्यक
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ९ : जागतिक मृदा दिनाच्या पार्श्वभूमीवर “मातीचे आरोग्य – अन्नसुरक्षेचा पाया” हा संदेश अधोरेखित करत कुरखेडा तालुका कृषी विभागाने जनजागृती उपक्रम राबवले. प्रत्येक वर्षी ५ डिसेंबरला साजरा होणाऱ्या जागतिक मृदा दिनानिमित्त आज भगवानपूर येथे शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले.
माती ही मानवजीवनाचा कणा असून अन्नउत्पादनापैकी तब्बल ९५ टक्के उत्पादन मातीवर अवलंबून आहे. मात्र अनियंत्रित रासायनिक वापर, जमिनीचे धूप, कीटकनाशकांची तीव्रता व हवामानातील अनिश्चिततेमुळे मातीचे आरोग्य धोक्यात येत आहे. जागतिक पातळीवर तब्बल ३३ टक्के जमीन दर्जाहीन झाल्याचे तज्ञांचे मत असून, उत्पादनक्षमता घटण्याची धोक्याची घंटा वाजत आहे.
राज्यातही सेंद्रिय कार्बनची कमतरता, कठीण थर निर्माण होणे, उध्वस्त माती, खारवटपणा असे प्रश्न गंभीर झाले आहेत. यासाठी माती परीक्षण, सेंद्रिय शेती, पाणीबचत तंत्रे व हिरवळी खतांचा वापर हा उपाय असल्याचे तालुका कृषी अधिकारी रूपाली जाधव यांनी सांगितले. “माती जपा म्हणजे अन्नसुरक्षा जपली जाईल,” असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
भगवानपूर येथे झालेल्या कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी कनिष्क वाघमारे यांनी जमीन सुपीकता निर्देशांक, जमीन आरोग्य पत्रिका आधारित संतुलित खत व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय व हिरवळी खताचे फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी माती नमुना घेण्याचे प्रात्यक्षिकही करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वितरित करून त्याचे वाचन व विश्लेषण करून प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. भगवानपूर व परिसरातील बहुसंख्य शेतकरी या उपक्रमास उपस्थित होते. मातीचे संवर्धन, मातीचे परीक्षण आणि शाश्वत शेती या माध्यमातूनच भविष्यातील अन्नसुरक्षा टिकून राहील, असा स्पष्ट संदेश या उपक्रमातून देण्यात आला.














