धानोरा तालुक्यातील 10 धान खरेदी केंद्रांना मंजुरी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २६ : खरीप हंगाम २०२५-२६ साठी आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदीला गती मिळाली असून, राज्य शासनाच्या मान्यतेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४७ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यापैकी धानोरा तालुक्यातील १० केंद्रांचा समावेश असून, यंदा काही संस्थांच्या धान घटीमुळे मंजूर केंद्रांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत ८ ने घटली आहे. सन २०२४-२५ मध्ये ५५ केंद्रांना परवानगी होती; मात्र धान खरेदीत तफावत दिसल्याने काही संस्थांना यंदा केंद्र मंजूर करण्यात आले नाही.
जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप हंगामात धान लागवड केली जाते. यंदा धान उत्पादन समाधानकारक झाल्याने आदिवासी विकास महामंडळाची खरेदी मागील वर्षापेक्षा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, धानोरा तालुक्यातील धानोरा आणि मुरूमगाव ही दोन केंद्रे महामंडळ स्वतः चालविणार आहे.
धानोरा तालुक्यातील मंजूर केंद्रांमध्ये मुरूमगावला ३२ गावे जोडून ४,००० क्विंटल, धानोरा केंद्राला १९ गावांसह ७,००० क्विंटल, मोहलीला १० गावांसह २,००० क्विंटल, सोड्याला १५ गावांसह १,८०० क्विंटल, चातगावला ११ गावांसह ७,८०० क्विंटल धान खरेदीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच पेंढरीला २० गावांसह २५,००० क्विंटल, कारवाफाला १८ गावांसह १०,००० क्विंटल, सुरसुडीला २६ गावांसह २१,००० क्विंटल, दुधमाळा केंद्राला १५ गावांसह १६,००० क्विंटल तर रांगी केंद्राला ८ गावांसह १८,००० क्विंटल धान खरेदी अपेक्षित आहे.
खरेदी केंद्रांच्या मंजुरीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार असून, खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













