गडचिरोलीत वनविभागाचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड

75

गडचिरोलीत वनविभागाचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड
– पत्र परिषदेत डॉ. प्रणय खुणे यांचा गंभीर आरोप, उच्चस्तरीय चौकशीची केली मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : अहेरी तालुक्यातील आलापल्ली व पेरमिली वनपरिक्षेत्रांमध्ये बोगस मजुरांच्या नावे खोट्या स्वाक्षऱ्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केला आहे. गडचिरोली वनविभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणी संबंधित वनाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. खुणे म्हणाले की, आलापल्ली आणि पेरमिली वनपरिक्षेत्रात वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासकीय निधीचा अपहार करण्यात आला आहे. मजुरांच्या नावे खोट्या स्वाक्षऱ्या करून बनावट हजेरीपत्रकांद्वारे कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली आहे. चौकशी अधिकार्‍यांनी या प्रकरणात बनावट अहवाल सादर करून दोषींना पाठीशी घातल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करून दोषींवर फौजदारी गुन्हे नोंदवावेत तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात यावी, अशी मागणी डॉ. खुणे यांनी शासनाकडे केली.
सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन आर्थिक वर्षांत जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण आदिवासी उपयोजना, राज्य योजना, कॅम्पा योजना आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांमध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी पत्र परिषदेतून केला आहे. शासनाने या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा डॉ. खुणे यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला शंकर ढोलगे, मनिषा मडावी, कृष्णा वाघाडे, रवी सेलोटे, विलास भानारकर, योगेश सिडाम, राहुल वासनिक, प्रवीण ठाकरे, आदर्श धुरके, दिलीप मेवगंटीवार आणि विजय मज्जी आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here