– ११ महिलांना मिळाली ‘लक्ष्मी’ रूपी भेट, ग्राम आरोग्य संस्था घाटीचा उपक्रम
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २७ : आजच्या युगात महिला सर्व क्षेत्रात आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. त्या केवळ घरापुरत्या मर्यादित नसून समाज, शिक्षण, उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातही सक्षमपणे योगदान देत आहेत. महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी व्यवसायाचे माध्यम स्वीकारून आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनता पार्टी कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले.
ते उषा इंटरनॅशनल लिमिटेड, दिल्ली व अफॉर्म, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ग्राम आरोग्य संस्था, घाटी यांच्या पुढाकाराने आयोजित “उषाताई स्कूल शिक्षिका प्रशिक्षित महिलांना शिलाई मशीन वाटप” या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बोलत होते.
या कार्यक्रमात एकूण ११ महिलांना शिलाई मशीनच्या स्वरूपात ‘लक्ष्मी भेट’ देण्यात आली. या उपक्रमाद्वारे महिलांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची संधी मिळाली असून त्यांच्यातील कला-कौशल्य आर्थिक प्रगतीचे साधन ठरावे, असे आवाहन फाये यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये होते. व्यासपीठावर ग्राम संस्थेचे अध्यक्ष रूपचंद दखणे, प्रा. विनोद नागपूरकर, रविभाऊ डोकरमारे, ह.भ.प. नत्थुजी दखने महाराज, नगरसेविका हेमलता नंदेश्वर आणि प्रशिक्षक शिक्षिका वर्षा मत्ते उपस्थित होत्या.
प्रास्ताविक करताना ग्राम आरोग्य संस्थेचे अध्यक्ष रूपचंद दखणे यांनी सांगितले की, “महिलांनी सलग नऊ दिवस प्रशिक्षण घेऊन शिलाई मशीन चालविण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्यांच्या मेहनतीला सलाम करून त्यांना आज ही भेट देण्यात आली आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रामचंद्र साहरे यांनी केले. या वेळी ग्राम आरोग्य संस्थेचे कर्मचारी, प्रशिक्षणार्थी महिला आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews














