– शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे सावट, मदतीची मागणी
The गडविश्व
ता. प्र /कुरखेडा, दि. २७ : तालुक्यात काल दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. दुपारी सुमारे १२ वाजल्यापासून सुरू झालेला हा अवकाळी पाऊस काही तास सतत कोसळत राहिला, परिणामी खरीप हंगामातील कापणीसाठी आलेल्या धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हवामानातील अचानक बदलामुळे पडलेल्या या पावसाने शेतात उभे असलेले आणि थ्रेशिंगसाठी कापलेले धान पूर्णपणे भिजले असून, कण काळे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्पादनात २० ते ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कुरखेडा तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी पिके सुकवण्यासाठी झगडत आहेत, परंतु सलग आर्द्रतेमुळे पिक सुकत नाही. “कापणीला आलेले धान आता चिखलात पडले आहे; खर्च गेले, आणि उत्पन्न हातचे गेले,” अशी हाक अनेक शेतकऱ्यांनी दिली.
गडचिरोली जिल्हा हा प्रामुख्याने धान उत्पादनावर अवलंबून असल्याने या पावसाचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर होणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक स्तरावर तीव्र होत आहे.
दरम्यान, कृषी विभाग आणि महसूल यंत्रणेला शेतकऱ्यांच्या या स्थितीची तात्काळ दखल घेऊन सर्वेक्षण सुरू करण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #














