सर्व निराधारांना अडीच हजार रुपयांचे मासिक अर्थसहाय्य द्या

85

सर्व निराधारांना अडीच हजार रुपयांचे मासिक अर्थसहाय्य द्या
-डाव्या मित्रपक्षांचा दिवाळीतच रस्त्यावर ठिय्या आंदोलनाची हाक
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात अल्प अर्थसहाय्य मिळणाऱ्या विधवा, परित्यक्ता आणि वयोवृद्ध निराधारांना दिवाळी साजरी करणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेंतील सर्व लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य लागू करावे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षासह डाव्या मित्रपक्षांनी १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाभरात एक दिवसाच्या ठिय्या आंदोलनाची घोषणा केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, डॉ. गुरुदास सेमस्कर यांच्या नेतृत्वात गडचिरोली तहसील कार्यालयासमोर निराधार योजनेचे लाभार्थी ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठिय्या मांडून आंदोलन करणार आहेत. धानाला शासनाने साडेतीन हजार रुपये हमीभाव द्यावा या मागणीचाही यात समावेश असणार आहे. आरमोरी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांच्या तर समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियास पठाण यांच्या नेतृत्वात देसाईगंज येथील तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते, माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, माजी पंचायत समिती सदस्य शिलाताई गोटा, युवक नेते भाई अक्षय कोसनकर, आकाश आत्राम यांच्या नेतृत्वात एट्टापल्ली कार्यालयासमोर तर भाई रमेश चौखुंडे, प्रभाकर गव्हारे, संजय दुधबळे, हेमंत खेडेकर यांच्या नेतृत्वात चामोर्शीत तसेच भाई चिरंजीव पेंदाम, राकेश मरापे यांच्या नेतृत्वात निराधार योजनेचे लाभार्थी ठिय्या आंदोलन छेडणार आहेत.
या एक दिवसीय ठिय्या आंदोलन व निदर्शनात विधवा – परित्यक्ता महिला, संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने आप आपल्या तहसील कार्यालयांसमोर एकत्र येऊन सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व समाजवादी पक्षातर्फे करण्यात आले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here