कुरखेडा गांधी चौक सौंदर्यीकरण वाद : नागरिकांचा सन्मान राखतच विकासाचे काम

138

कुरखेडा गांधी चौक सौंदर्यीकरण वाद : नागरिकांचा सन्मान राखतच विकासाचे काम
– नगरपंचायतीचा निर्धार
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १३ : कुरखेडा नगरपंचायतीच्या प्रस्तावित गांधी चौक सौंदर्यीकरण प्रकल्पाभोवती निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज नगरपंचायत कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उपनगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती बबलू हुसैनी यांनी सांगितले की, “हा प्रकल्प कोणत्याही धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर केवळ विकास आणि परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या भावना आणि अपेक्षांचा सन्मान राखूनच पुढील निर्णय घेतले जातील.”
पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष अनिता बोरकर, नगरसेवक जयेंद्र चंदेल आणि अशोक कंगाले उपस्थित होते.
हुसैनी यांनी स्पष्ट केले की, “प्रकल्पाला काहींनी हेतुपुरस्सर धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात सर्व निर्णय नगरसेवकांच्या संमतीने आणि पारदर्शकतेने झाले आहेत. नागरिकांना शंका असल्यास त्यांनी थेट संवाद साधावा, पेपरबाजी करून गैरसमज निर्माण करू नयेत.”
नगराध्यक्ष अनिता बोरकर यांनी सांगितले की, “गांधी चौक परिसरातील नागरिकांच्या भावना आम्हाला महत्त्वाच्या आहेत. सौंदर्यीकरणाचे काम लोकभावनांचा आदर राखूनच पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर, चौकात होत असलेल्या बेशिस्त वाहन पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच कठोर कारवाई करण्यात येईल.”
या प्रकल्पाच्या समर्थनार्थ नगरसेवक जयेंद्र चंदेल आणि अशोक कंगाले यांनीही मते नोंदवली. त्यांनी सांगितले की, “गांधी चौक हा शहराचा चेहरा आहे. त्यामुळे त्याचे नियोजनबद्ध विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. नागरिकांच्या सूचना व तक्रारींचाही गांभीर्याने विचार करण्यात येईल.”
नगरपंचायतीने पत्रकार परिषदेतून नागरिकांना संवादाचे आवाहन करत, “गांधी चौक प्रकल्प लोकाभिमुख पद्धतीनेच राबवला जाईल”, असा ठाम संदेश दिला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत नागरिकांसोबत विशेष बैठक आयोजित करून त्यांचे मत जाणून घेण्याची नगरपंचायतीची तयारी सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolipolice

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here