पोलिस भरती तयारी करणाऱ्या तरुणांना तहसीलदार प्रीती डूडूलकर यांची प्रेरणादायी भेट
– कोंढाळा गावातील तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तके वाटप
The गडविश्व
देसाईगंज, दि. ०७ : “गावात राहूनही अभ्यास करून आपले ध्येय साध्य करता येते,” असा आत्मविश्वास वाढविणारा संदेश देसाईगंजच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ. प्रीती डूडूलकर यांनी कोंढाळा येथील स्पर्धा परीक्षा व पोलिस भरती तयारी करणाऱ्या तरुणांना दिला. यावेळी त्यांनी स्वतःच्या हस्ते तरुणांना अभ्यासासाठी आवश्यक पुस्तके भेट देत त्यांना मार्गदर्शन केले.
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा या सुमारे ३७०० लोकसंख्या असलेल्या गावातील अनेक तरुण-तरुणी पोलिस भरती, आर्मी, तलाठी, ग्रामसेवक तसेच MPSC अशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. या विद्यार्थ्यांसोबत सरपंच अपर्णा राऊत यांनी तहसील कार्यालयात भेट देऊन डूडूलकर यांच्याशी संवाद साधला.
या वेळी तहसीलदार डूडूलकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “दररोज अभ्यासाबरोबरच चालू घडामोडींचे ज्ञान ठेवण्यासाठी वर्तमानपत्र वाचनाची सवय लावा. आपण कुठूनही अभ्यास केला तरी सातत्य आणि आत्मविश्वास ठेवा, यश नक्की मिळेल. तुमच्या यशासाठी प्रशासन सदैव पाठिशी आहे.”
त्यांनी तरुणांना पुस्तके देऊन अभ्यासात नवनवीन विषयांचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असा थेट पाठिंबा मिळाल्याने उपस्थित तरुणांनी तहसीलदार डूडूलकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. “त्यांनी दिलेली पुस्तके आमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणादायी ठरतील,” असे मत युवकांनी व्यक्त केले.
या उपक्रमामुळे कोंढाळा गावातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये नवीन उत्साह संचारला असून, ग्रामपातळीवर अशा अधिकारी-दातृत्वाच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #PoliceRecruitment #Desaiganj #Kondhala #PrityDudulkar #InspiringOfficer #MPSC #YouthEmpowerment













