गडचिरोली : अवैध रेती तस्करीवर मोठी धडक कारवाई, २९ कोटींचा दंड

232

गडचिरोली : अवैध रेती तस्करीवर मोठी धडक कारवाई, २९ कोटींचा दंड
– १५ हजारांहून अधिक ब्रास रेतीसाठा जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. ६ : सिरोंचा तालुक्यातील अवैध रेती तस्करीवर प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली असून तब्बल १५ हजार ६६५ ब्रास अवैध रेतीसाठा आणि ८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात तब्बल २९ कोटी ३६ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.
सिरोंचा परिसरात अवैध गौण खनिज तस्करीबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा अहेरीचे उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांना विशेष तपासणीचे आदेश दिले. त्यानंतर २ ऑक्टोबर २०२५ रोजी जैन यांच्या पथकाने अंकिसा माल, चिंतरेवला आणि मद्दीकुंठा परिसरात अचानक छापेमारी केली.
तपासणीदरम्यान अंकिसा माल येथील सर्व्हे क्र. ९०८, ६९० आणि ६९१ मधील रेती साठ्यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळली. तर मद्दीकुंठा येथील सर्व्हे क्र. ५३३ मध्ये परवानगी असलेल्या ठिकाणी साठा नसून, तो सर्व्हे क्र. ३५६ या दुसऱ्याच ठिकाणी आढळून आला. तेथे साठवलेली १५,६६५ ब्रास रेती ही बिनपरवानगी साठवणूक असल्याचे निष्पन्न झाल्याने ती तत्काळ जप्त करण्यात आली.
याचबरोबर अवैध उत्खननासाठी वापरण्यात आलेली २ जेसीबी, १ पोकलैंड मशीन आणि ५ ट्रक ही वाहने देखील ताब्यात घेण्यात आली आहेत.
तहसिलदार, सिरोंचा यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८(७) व ४८(८) नुसार अहवाल सादर केला असून, उपविभागीय अधिकारी, अहेरी यांनी या प्रकरणात २९ कोटींपेक्षा अधिक दंड आकारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
अंतिम सुनावणी आणि अपीलाच्या अधीन राहून दंडाची रक्कम निश्चित केली जाईल, असे सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन यांनी स्पष्ट केले. या कारवाईनंतर सिरोंचा परिसरातील अवैध रेतीतस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Sironcha #IllegalSandMining #AdministrationAction #Penalty #MaharashtraGovernment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here