गडचिरोली : अनुकंपा आणि सरळसेवा पदभरतीच्या २१० उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : गडचिरोली जिल्ह्यात आजचा दिवस अनेक उमेदवारांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण ठरला. अनुकंपा व सरळसेवा भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या एकूण २१० उमेदवारांना सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यक्रम दूरदृष्य प्रणालीद्वारे पार पडला. त्याचवेळी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या भरतीत ८० उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडले गेले तर १३० उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात आली. यामध्ये ५९ महिला उमेदवारांचा समावेश असून, विशेष म्हणजे अनुकंपा यादीतील काही उमेदवार तब्बल १० ते १५ वर्षांपासून प्रतीक्षेत होते.
नव्याने नियुक्तांना संबोधित करताना सहपालकमंत्री जयस्वाल म्हणाले, “शासनाची ही संधी जनतेच्या सेवेसाठी वापरा. नागरिकांचा विश्वास जिंकणे, जलद व पारदर्शक सेवा देणे हाच खरा शासकीय सेवेचा उद्देश आहे.”
या सोहळ्यात नियुक्तीपत्र स्वीकारताना उमेदवारांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले, तर सभागृहात टाळ्यांचा गजर घुमला. पालक व कुटुंबीयांची उपस्थिती कार्यक्रमाला भावनिक स्पर्श देणारी ठरली.
गडचिरोली जिल्ह्यातील २१० उमेदवारांच्या सेवाप्रवेशामुळे जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेला नवे बळ मिळणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













