अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा : परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

109

अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा : परिवहन आयुक्त विवेक भिमनवार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : “अपघातांचे नेमके कारण शोधा आणि त्यावर आधारित अभ्यासपूर्ण उपाययोजना त्वरित राबवा,” अशा स्पष्ट सूचना परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिल्या. अतिवेग, हेल्मेटचा अभाव आणि मद्यधुंद अवस्थेत वाहनचालक हे अपघातांस कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महामार्गावर ITMS प्रणाली व ब्लॅक स्पॉटवर लक्ष

भिमनवार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील बहुसंख्य अपघात राष्ट्रीय महामार्गावर, दोनचाकी वाहनांशी संबंधित तसेच संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेत घडतात. त्यामुळे महामार्गावर ITMS प्रणाली कार्यान्वित करून अतिवेगावर नियंत्रण आणावे, ऑटोमॅटिक चलन जनरेट करण्याची व्यवस्था करावी, दुभाजक व रस्त्यांची रुंदी वाढविण्याची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. अपघातप्रवण ३१ ठिकाणांना ब्लॅक स्पॉट घोषित करून उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला. कामे टाळणाऱ्या कंत्राटदारांवर एफ.आय.आर. दाखल करण्याच्याही सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.#

ड्रंक अँड ड्राईव्ह व ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई

अपघात टाळण्यासाठी संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेत विशेष मोहिमा राबविण्याचे निर्देश देत आयुक्तांनी दंड आकारणी वाहनांच्या वर्गवारीनुसार निश्चित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश त्यांनी दिले.

गोल्डन अवर ट्रिटमेंटवर भर

“अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी ‘गोल्डन अवर ट्रिटमेंट’ सर्वात महत्त्वाची आहे,” असे सांगून त्यांनी आरोग्य विभागाला त्वरित प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका वाढविणे आणि सुरक्षा निधीतून नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी रस्ते सुरक्षा उपाययोजनांमध्ये तंत्रज्ञानाधारित नाविन्यपूर्ण योजना सादर करण्यावर भर दिला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here