महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडून सेवा पंधरवाडा उपक्रमात नागरिकांच्या तक्रारींची थेट दखल

54

-नागरिकांच्या तक्रारी वेळेवर सोडविण्याच्या सूचना
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाडा उपक्रमात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी थेट नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्या तक्रारींची माहिती घेतली.
या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपापल्या तक्रारी मांडल्या. प्राप्त तक्रारींवर त्वरीत कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना मंत्रीद्वयांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपवनसंरक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शासनाच्या गतिमान कार्यपद्धतीचा प्रत्यय देत अनेक तक्रारींचे निवारण जागेवरच करण्यात आले.
विशेष म्हणजे, ९० दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या एका तक्रारीची दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय चौकशी करून वेतनवाढ रोखण्यासाठी शिफारस करण्याच्या सूचना दिल्या. “अधिकाऱ्यांनी वेळेवर काम केले असते तर नागरिकांना इतक्या मोठ्या प्रमाणात इथे यावे लागले नसते. प्रशासनाने नागरिकांना वेळ देऊन त्यांच्या तक्रारी वेळेत सोडवाव्यात,” अशा शब्दांत त्यांनी स्पष्ट इशारा दिला.
या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, संजय आसवले तसेच सर्वश्री अशोक नेते, डॉ. देवराव होळी, रमेश बारसागडे, प्रशांत वाघरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here