The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १९ : धानोरा पंचायत समिती अंतर्गत नवरगावचे ग्रामपंचायत अधिकारी व राज्य पुरस्कारप्राप्त अधिकारी खुशाल गोमाजी नेवारे यांची बदली झाल्याने नवरगाव, राजोली, एरंडी व भुरानटोला येथील गावकऱ्यांच्या वतीने दि. १४ सप्टेंबर रोजी भव्य निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच सौ. रंजनाताई विजय शिडाम, सदस्य कपिल कोवा, भीषण हलामी, साईनाथ गेडाम, रोशनी कोकोडे, रेशमीला मडावी, रुपाली कोरचा यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निरोप समारंभाचे अध्यक्षस्थान नवरगावचे भुम्या श्री. झित्रू कोवा यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून चारही गावांचे पोलिस पाटील, माजी पंचायत समिती सदस्य महागु वाडगुरे, सुधाकर गावडे (एरंडी), माजी सरपंच नामदेव नरोटे (भुरानटोला), माजी सरपंच देवाजी पदा, ग्रामपंचायत कर्मचारी, डोंगरे तलाठी तसेच नव्याने नियुक्त झालेले ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी गावकऱ्यांनी नेवारे यांचा गौरव करून त्यांना भावनिक निरोप दिला. नवे ग्रामपंचायत अधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पोलिस पाटील अजय पदा यांनी केले.
आपल्या मनोगतात नेवारे म्हणाले, “आदिवासी विभागात कार्य करताना गावकऱ्यांनी सदैव साथ दिली. त्यांच्या सहकार्यामुळेच मला ‘राज्य ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार’ मिळाला. यासाठी मी सर्व गावकऱ्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.”
ग्रामपंचायत समिती व गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे निरोप समारंभ उत्साहात व यशस्वी पार पडला.
#thegadvishva #thegdv #gadchirolinews #thegadvishva #gadchirolipolice













