– पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा निरोप समारंभ संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी या उपक्रमातून आयोजित पोलीस भरतीपूर्व निवासी प्रशिक्षणाचा निरोप समारंभ आज एकलव्य हॉल, पोलीस मुख्यालय येथे उत्साहात पार पडला. या सत्रात एकूण १२५ युवक-युवतींनी प्रशिक्षण पूर्ण करून भरतीसाठी सज्ज झाले आहेत.
०६ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०२५ या ४० दिवसांच्या कालावधीत झालेल्या या प्रशिक्षणात उमेदवारांना पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेली मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, सायबर जनजागृती, महिला गुन्हे, तसेच नवे कायदे या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना पोलीस दलाकडून लोअर, टी-शर्ट, शुज, अभ्यासक्रम पुस्तके व आवश्यक साहित्य मोफत देण्यात आले.
समारंभात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “आगामी पोलीस भरती ही सुवर्णसंधी आहे. पुढील १०० दिवस जिद्दीने, मेहनतीने व चिकाटीने परिश्रम करून यश संपादन करा.” त्यांनी अभ्यासाबरोबरच जागतिक घडामोडींविषयी सतत अद्ययावत राहण्याचे आवाहनही केले.
या प्रशिक्षणाअखेर घेण्यात आलेल्या चाचण्यांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या उमेदवारांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली पोलीस दलाने आजवर ११ सत्रांतून एकूण २,३१८ युवक-युवतींना भरतीपूर्व प्रशिक्षण दिले असून त्यापैकी २०५ जणांची शासनाच्या विविध विभागांत निवड झालेली आहे. तसेच “एक गाव – एक वाचनालय” या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ७२ ठिकाणी वाचनालये उभारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून २०२१ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत तब्बल ११,०१,०१४ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला आहे.
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्ट प्रभारी अधिकारी, नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि. चंद्रकांत शेळके, तसेच सर्व प्रशिक्षक व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













