२५ लाखांची लोकवर्गणी थेट वैयक्तिक खात्यात? – गडचिरोलीतील पीएम नेहरू नगरपरिषद शाळेचा घोटाळा चर्चेत

112

– आजाद समाज पार्टी अध्यक्ष राज बन्सोड व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ. अमोल मारकवार यांनी केला आरोप
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : शासकीय शाळा ही गरीब व वंचित घटकांच्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी असते. मात्र गडचिरोलीतील पीएम श्री. जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक डिजिटल शाळा, रामनगर येथेच नियमबाह्य शुल्क वसुलीचा घोटाळा उघडकीस आला आहे. या शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांनी पालकांकडून लाखो रुपये शुल्क व दान गोळा करून ते थेट आपल्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केल्याचा गंभीर आरोप आजाद समाज पार्टी अध्यक्ष राज बन्सोड व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ. अमोल मारकवार यांनी केला आहे.
माजी नगरसेवक गुलाब मडावी यांनी माहिती अधिकारातून मागविलेल्या अहवालानुसार, २०१९ ते २०२५ या सहा वर्षांत तब्बल २५ लाख १४ हजार ५०० रुपये पालकांकडून “शाळा सुधार फंड” आणि मासिक शुल्क या नावाखाली वसूल करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे या पैशाचे लेखापरीक्षण नगरपरिषदेकडे नाही तर थेट मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांच्या वैयक्तिक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे.
याशिवाय नियमबाह्य नर्सरी वर्ग सुरू करणे, पालकांकडून फी/दान वसूल करणे, पावती पुस्तके छापणे, खाजगी संस्थेकडून लेखापरीक्षण करून नगरपरिषदेकडे अहवाल न सादर करणे, शाळेच्या संसाधन खरेदीत नियम मोडणे अशा अनेक अनियमिततेचे आरोप करण्यात आले आहेत. या सर्व गैरकारभाराला नगरपरिषद मुख्याधिकारी सुर्यकांत पिद्दूरकर यांनी मूक संमती दिली असल्याचे राज बन्सोड आणि कॉ. अमोल मारकवार यांनी ठपक्यात नमूद केले आहे.
RTE कायद्याचे उल्लंघन करून शाळेत शुल्क गोळा केल्याने गरीब मुलांना प्रवेश मिळत नाही, परिणामी ते शिक्षणापासून वंचित राहतात. हे संविधानाने दिलेल्या शिक्षणाच्या हक्कावर गदा आणणारे असल्याचे आजाद समाज पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निवेदनात स्पष्ट केले आहे.
या घोटाळ्याची तातडीने चौकशी करून मुख्याध्यापक सुधीर गोहणे आणि मुख्याधिकारी सुर्यकांत पिद्दूरकर यांना निलंबित करावे, अन्यथा २२ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन २४ सप्टेंबरपासून उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना आजाद समाज पार्टी अध्यक्ष राज बन्सोड, प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, महिला प्रमुख सोनाशी लभाने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ. अमोल मारकवार, माजी नगरसेवक गुलाब मडावी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या उघडकीमुळे गडचिरोलीत सर्रास चर्चा सुरू असून, “शासन निधी व शिक्षणकराचा पैसा नेमका कुठे जातो?” हा प्रश्न आता जनतेसमोर तीव्रतेने उपस्थित होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here