The गडविश्व
गडचिरोली, दि. ६ : गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या दोन महत्त्वाच्या सण-उत्सवांच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांनी शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात उत्सव साजरा करावा, यासाठी गडचिरोली जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई हाती घेतली आहे.
बी.एन.एस.एस. कलम १६३ (२) अंतर्गत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याची शक्यता असलेल्या एकूण ७७ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये कुरखेडा ५, वडसा ११, कोरची ३, गडचिरोली ९, आरमोरी १९, चामोर्शी ४, अहेरी ११, मुलचेरा ५, आष्टी ९ व रेपनपल्ली १ अशा प्रकारे विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांचा समावेश आहे.
सदर सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीपासूनच कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन, अवैध व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच समाजातील शांतता भंग करणारी गंभीर कृत्ये यांसारखे गुन्हे दाखल आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेस बाधा निर्माण होऊ नये, तसेच समाजात भीतीचे वातावरण पसरू नये या हेतूने ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नागरिकांना आवाहन केले की, “सर्वांनी बंधुता, सामाजिक सौहार्द आणि शांतता जपत उत्सव साजरा करावा. कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये.”
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणेप्रमुख यांच्या संयुक्त सहभागातून पार पडली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














