The गडविश्व
गडचिरोली, दि. ६ : गडचिरोली जिल्ह्यात महिलांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या सलग दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणात दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, १९ जून रोजी प्रिया विकास मंडल ही महिला चामोर्शी-घोट मार्गावर प्रवास करीत असताना हनुमान मंदिराजवळ दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी तिच्या पाठीवरील १,२५,०३९ रकमेची बॅग हिसकावून नेली होती. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी गणपूरजवळ पुन्हा एकदा त्याच महिलेकडून १,३४,०६४ रकमेची बॅग हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व चामोर्शी पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अखेर आरोपी शशांक संजय दुर्गे (२७) व राजा तोताराम कोरडे (२५), दोघेही रा. मलेझरी, ता. मुलचेरा यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून यापूर्वीही अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सदर आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल असून पुढील तपास सपोनि. सुमित बनसोडे (पोस्टे चामोर्शी) करीत आहेत.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये सपोनि. भगतसिंग दुलत, पोहवा सतिश कत्तीवार, नापोअं धनंजय चौधरी, पोअं राजू पंचफुलीवार, शिवप्रसाद करमे व चापोअं दिपक लोणारे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #गडचिरोली #पोलीसकारवाई #जबरीचोरी #स्थानिकगुन्हेशाखा #अटक #गुन्हेउघडकीस #गडन्यूज #महाराष्ट्रपोलीस #LawAndOrder #CrimeNews














