
शासनाच्या डीओअभावी रांगी केंद्रावर १४,४९८ क्विंटल धान्य पडून; अवकाळी पावसाने मोठे नुकसान
– धान काळे पडल्याने गुणवत्तेवर परिणाम; नवीन धान खरेदीसाठी जागेचा प्रश्न ऐरणीवर
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि.१३ : धानोरा तालुक्यातील रांगी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर शासनाच्या डीओअभावी तब्बल १४ हजार ४९८ क्विंटल धान्य पडून आहे. ऑक्टोबर महिना उलटूनही खरेदी केलेल्या धान्याची उचल करण्यात आलेली नसल्याने अवकाळी पावसामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक पोत्यांतील धान ओलाव्यामुळे काळे पडले असून त्याच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे.
रांगी येथील आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्था (र.नं. ७१०) अंतर्गत खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात आले. मात्र, खरेदी केलेल्या धानाची उचल करण्यासाठी संबंधित विभागाकडून आवश्यक असलेले डीओ (डिलिव्हरी ऑर्डर) अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे केंद्रावर मोठ्या प्रमाणात धान्य साठवून ठेवण्याची वेळ संस्थेवर आली आहे.
दीर्घकाळ धान्य पडून असल्याने अवकाळी पावसाचे पाणी पोत्यांमध्ये शिरले. परिणामी, धान ओलसर होऊन काळे पडले असून काही पोत्यांचेही नुकसान झाले आहे. यामुळे धानाच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, केंद्रावरील उपलब्ध जागा धान्याने व्यापल्याने नव्या खरीप हंगामातील धान खरेदी कशी करायची, असा प्रश्न संस्थेसमोर उभा ठाकला आहे.
शासनाच्या विलंबामुळे एकीकडे आधीच खरेदी केलेल्या धानाचे नुकसान होत असताना दुसरीकडे नवीन धान खरेदीतही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रांगी येथील धान खरेदी केंद्रावरील साठ्याची तातडीने पाहणी करावी आणि आवश्यक डीओ जारी करून धान्याची लवकरात लवकर उचल करावी, अशी मागणी होत आहे.













