
देसाईगंजच्या गजबजलेल्या मुख्य मार्गावर भरधाव पिकअपने अनेक वाहनांना चिरडले, सात जण जखमी
– संगम मॉलसमोरील अपघातात ५ ते ७ वाहनांचे नुकसान, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
The गडविश्व
ता.प्र/ देसाईगंज, १३ : शहरातील गजबजलेल्या मुख्य मार्गावर भरधाव पिकअप वाहनाने धुमाकूळ घालत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांना चिरडल्याची घटना शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी घडली. संगम मॉलसमोर घडलेल्या या अपघातात सात जण जखमी झाले असून पाच ते सात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३५ एजे ३१२८ क्रमांकाचा पिकअप वाहनचालक कुमरे हा कुरखेडा मार्गाने देसाईगंजकडे येत होता. यावेळी संगम मॉलसमोरील सुंदरकर गॅरेजपासून बजरंग मेन्स वेअरपर्यंतच्या परिसरात त्याने भरधाव वेगाने वाहन चालवत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती असून, या घटनेत पाच ते सात वाहनांचे नुकसान झाले.
या अपघातात देसाईगंज येथील वसंत जोशी आणि मनोहर रायपुरे, कोकडी येथील कृष्णा नेवारे व रामू सहारे, तसेच गेवर्धा येथील आनंदेश्वर सुकारे, रितिक सुकारे आणि सुजल नाकाडे असे सात जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी अपघातग्रस्त पिकअप वाहन जप्त करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अतिक्रमणामुळे मुख्य मार्ग अरुंद; अपघातानंतर प्रश्न ऐरणीवर
देसाईगंज शहरातील मुख्य मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. विशेषतः बसस्थानक परिसरात प्रवासी, पादचारी आणि वाहनांची सतत ये-जा सुरू असते. मात्र, मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूंना झालेले अतिक्रमण, दुकानांसमोरील पार्किंगचा अभाव आणि रस्त्याच्या कडेला उभी केली जाणारी खासगी वाहने यामुळे रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत आहे. परिणामी, वाहतुकीचा खोळंबा होण्यासोबतच अपघातांचा धोकाही वाढत आहे.
या अपघातानंतर नागरिकांनी पुन्हा एकदा मुख्य मार्गावरील अतिक्रमणाचा प्रश्न उपस्थित केला आहे. भविष्यात अशा प्रकारची मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटवून वाहतुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलीस निरीक्षक स्वप्निल इजप्पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मनीष गोडबोले, एपीआय विजय गिते, एपीआय स्वाती फुलेकर तसेच हवालदार किरण नारदेलवार, सलामखान पठाण, करणशहा हुर्रा, दिनेश सोनकुसरे, राजू उराडे, सुनील मडावी आणि जितेंद्र सहारे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या अपघातामुळे देसाईगंजमधील मुख्य मार्गावरील अतिक्रमण आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सात जण जखमी होण्याइतकी गंभीर घटना घडल्यानंतर तरी नगर परिषद प्रशासन अतिक्रमण हटविण्यासाठी ठोस कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #accident
#Desaiganj #Gadchiroli #RoadAccident #PickupAccident #TrafficSafety #Encroachment #TheGadvishva













