
गर्भाशयाबाहेरील गर्भधारणा फुटल्याने महिलेची प्रकृती गंभीर; लॉयड्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेद्वारे जीवदान
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : गर्भाशयाबाहेरील गर्भधारणा फुटल्याने तीव्र अंतर्गत रक्तस्राव होऊन मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या ३० वर्षीय महिलेला लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने यशस्वी उपचार करून जीवनदान दिले. अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या या महिलेवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आणि विविध वैद्यकीय विभागांच्या समन्वयामुळे महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले.
सीमा रॉय असे या महिलेचे नाव असून, तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. तिच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अवघे ५.८ ग्रॅम प्रति डेसीलिटर इतके होते. गर्भाशयाबाहेरील गर्भधारणा (एक्टोपिक प्रेग्नन्सी) फुटल्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्राव झाला होता. परिणामी तिचा रक्तदाबही अत्यंत अस्थिर झाला होता. रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने जीवनरक्षक उपचार सुरू केले आणि पुढील उपचारांसाठी अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलविले.
वैद्यकीय तपासणीत गर्भाशयाबाहेरील गर्भधारणा फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आपत्कालीन एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णाचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नॉरअॅड्रेनालिन औषधाचा आधार द्यावा लागत होता. तसेच तीव्र रक्तक्षयामुळे शस्त्रक्रियेपूर्वीच रक्त संक्रमणासह आवश्यक जीवनरक्षक उपचार सुरू करण्यात आले.
रुग्णाची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने शस्त्रक्रिया आणि भूल व्यवस्थापन हे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, शल्यचिकित्सक आणि भूलतज्ज्ञांच्या पथकाने समन्वयाने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर महिलेला पुढील निरीक्षण आणि उपचारांसाठी पुन्हा आयसीयूमध्ये हलविण्यात आले.
वेळीच निदान, तातडीची शस्त्रक्रिया, योग्य भूल व्यवस्थापन आणि वैद्यकीय पथकातील समन्वय यामुळे महिलेला जीवदान मिळाले. या यशस्वी उपचाराबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी डॉक्टरांसह संपूर्ण आरोग्य पथकाचे अभिनंदन केले. दुर्गम भागातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात रुग्णालयाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #LloydsHospital #MedicalSuccess #EctopicPregnancy #EmergencySurgery #Healthcare #Maharashtra













